आठवा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा लाभ होण्याची शक्यता
केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आठवा वेतन आयोग निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यासाठी २.८६ च्या फिटमेंट फॅक्टरचा वापर करू शकतो, ज्यामुळे मासिक पेन्शनमध्ये मोठी वाढ होईल.
सध्या, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, किमान मूलभूत पेन्शन ₹9,000 प्रतिमहिना आहे, तर जास्तीत जास्त पेन्शन ₹1,25,000 आहे. आठवा वेतन आयोगाच्या २.८६ फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर पेन्शनमध्ये १८६% वाढ होऊ शकते. यामुळे किमान पेन्शन ₹25,740 पर्यंत वाढेल आणि जास्तीत जास्त पेन्शन ₹3,57,500 प्रतिमहिना होईल.
त्याशिवाय, महागाई भत्ता (डीआर) सारख्या सवलतींमुळे पेन्शनधारकांना अधिक आर्थिक लाभ होईल. सध्या डीआर मूळ पेन्शनच्या ५३% आहे, आणि वर्षातून दोनदा त्यामध्ये सुधारणा केली जाते. त्यामुळे महागाईशी सामना करण्यासाठी पेन्शनधारकांना अधिक मदत मिळेल.
२०२६ पासून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळेल.