भाजप महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळातील प्रमुख चेहरे
भाजप महायुतीच्या आगामी मंत्रिमंडळात काही प्रमुख नेत्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे मंत्रिमंडळ तयार होईल, ज्यामध्ये काही नावं महत्वाची मानली जात आहेत.
गिरीश महाजन
उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे मजबूत आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन फडणवीसांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. विधानसभेत सर्वाधिक जागा निवडून आणण्यात महाजन यांचा मोठा वाटा आहे.
राधाकृष्ण विखे पाटील
अनुभवी नेता राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याच्या राजकारणातील मोठं नाव आहे. विधानसभेला त्यांनी विखे पॅटर्नद्वारे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मोठं यश मिळवलं. त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
आशिष शेलार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे.
पंकजा मुंडे
राज्याच्या ओबीसी चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांना मानलं जातं. मराठवाड्यात भाजपच्या प्रचारात त्यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
अतुल सावे
छत्रपती संभाजीनगरातील सावे हे माळी समाजाचे एकमेव प्रतिनिधी आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला मजबूत करणे हे त्यांचे उद्दिष्ट असेल.
संजय कुटे
पश्चिम विदर्भातून सलग ५ वेळा निवडून आलेले अभ्यासू ओबीसी नेता म्हणून कुटे यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते.
नितेश राणे
कोकणातील आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून नितेश राणे यांची ओळख आहे. राज्यभरातील हिंदू मोर्च्यांना त्यांनी प्रचंड प्रतिसाद मिळवून दिला आहे.
गोपीचंद पडळकर
धनगर समाजाचा एकमेव आमदार म्हणून विजयी ठरलेले गोपीचंद पडळकर हे फडणवीसांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
भाजपच्या नव्या मंत्रिमंडळात या नेत्यांची निवड होत असल्यास पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये मोठा फायदा होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.